तळेगाव बोरी येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
फळबाग, भाजीपाला आणि आंबा पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल

लातूर प्रतिनिधी : लातूर जिल्हयात मागील चार दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याचा वारा यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 1 हजार 167 हेक्टर एवढ्या शेत जमिनीवरील हंगामी पिकं, फळ झाडे यांचे नुकसान झाले आहे. तळेगाव बोरी येथील परिसरात वादळ वारा यामुळे मोठ-मोठे झाडे तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुक खोळंबली तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे विज प्रवाह खंडीत झाला आहे. आंबा, फुलशेती, टरबुज, काकडी, केळी आणि मिरच्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
ज्वारीच्या पिकाचे नुकसान, भरपाई मिळणार का ? शेतकरी संभ्रमात
तळेगाव बोरी सह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बिगर हंगामी ज्वारी पेरली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करुन ज्वारीचे पिक घेतले आहे. पण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने हातातोंडाशी आलेले सर्व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करुन मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. पण ज्वारीचा हंगाम संपल्यामुळे मदत मिळण्याची शास्वती अधिकारी देत नाहीत. यामुळे शेतकरी आणि कृषि अधिकाऱ्यांत वाद होत आहेत. ज्वारीचा हंगाम नसला तरी आम्ही पिक घेतले आहे व नुकसान ही मोठ्या प्रमाणात झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र नुकसानीची भरपाई मिळेल का या बाबत शेतकऱ्यांत संभ्रम आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याची व मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चिंचोली काजळे ता. औसा येथील हणमंत उपाध्याय यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मार्चमध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी 10 कोटी 77 लाख रुपये मदत दिली आहे. अशी माहिती दिली.
जिल्हयात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीठीचा सामना करावा लागला आहे. 25 एप्रिल पासुन सुरु झालेला अवकाळी पाऊस, वादळ – वारा व काही भागात गारपिटीमुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 5 व्यक्ती आणि 100 जनावरे दगावली आहेत. याबाबचे पंचनामे प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पालकमंत्र्यांना दिली.
Comments
Post a Comment