ADM (Agro) कंपनी 200 क्षयरुग्णांना घेतले दत्तक

ADM (Agro) कंपनी 200 क्षयरुग्णांना घेतले दत्तक

प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दिला पोषक आहार (फूड बास्केट)

लातूर प्रतिनिधी : केंद्रशासनाने सन २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत चे धोरण निश्चित केले आहे. व याअंतर्गत केंद्र शासनामार्फत “प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान” या अभियानाची घोषणा करण्यात आलेली आहे. याअंतर्गत समाजातील ईच्छूक दानशूर व्यक्ति, सहकारी संस्था, अशासकीय सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपनी, इतर कार्यालये आणि संस्था, औद्योगिक संघटना, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, वैयक्तिक व्यक्ति, सामाजिक कार्यकर्ते यांनी “निक्षय मित्र” म्हणून सहभाग घेवून स्वईच्छेनूसार एक कींवा अनेक क्षयरुग्णांना दत्तक घेवून त्यांचा उपचार चालू असलेल्या कालावधीत पोषक आहार (फुड बास्केट) उपलब्ध करून देणेबाबत लातूर मनपामार्फत आवाहन करण्यात आले होते.


लातूर मनपाच्या आवाहनास प्रतिसाद देवून एम.आय.डी.सी भागातील ADM Agro & Vizag Ltd. लातूर या कंपनीने सामाजिक बांधिलकी म्हणून लातूर शहरातील २०० क्षयरुग्ण दत्तक घेतले असून २०० क्षयरुग्णांना त्यांचा उपचार चालू असेपर्यंत अर्थात पुढील ६ महिने पोषक आहार फूड बास्केट देण्यात येणार आहेत. ADM Agro & Vizag Ltd. लातूर यांनी एका महिन्याच्या फूड बास्केटसाठी शासनाने निश्चित करून दिलेल्या गहू ३ kg, चना दाळ १.५ kg, खाद्यतेल २५० gm, शेंगदाणे १ kg या चार पोषक अन्नधान्याशिवाय सोयावडी १.५ kg, मुगदाळ १ kg, पेंडखजूर १ kg या ३ अतिरिक्त पोषक आहाराचा समावेश करून खाद्यतेल २५० gm ऐवजी प्रत्येकी २ kg याप्रमाणात समाविष्ट करून प्रत्येक रुग्णास फूड बास्केट पँकींग सह पूरवठा केल्या आहेत.


आज १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री.बाबासाहेब मनोहरे, आयुक्त, लातूर शहर महानगरपालिका यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वितरण करण्यात आले. यावेळी उपायुक्त श्रीमती. वीणा पवार, ADM (Agro) चे वित्तीय व्यवस्थापक श्री.मनोज शिंदे, श्री.बाळकृष्ण चालोत्रे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी, आरोग्यअधिकारी डॉ.प्रशांत माले, मनपा क्षयरोग अधिकारी डॉ.महेश पाटील, जिल्हा क्षयरोग केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षवर्धन राऊत, क्षयरोग पर्यवेक्षक श्री.महेश गायकवाड तसेच सर्व प्रा.ना.आ.केंद्रचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त श्री.बाबासाहेब मनोहरे यांनी ADM (Agro) चे वित्तीय व्यवस्थापक श्री.मनोज शिंदे, श्री. बाळकृष्ण चालोत्रे यांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी अंतर्गत २०० क्षयरुग्णांना दत्तक घेवून “प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान ” मध्ये निक्षय मित्र म्हणून सहभाग नोंदवल्याबद्दल व सहकार्य केल्याबद्दल ADM (Agro) या कंपनीचे आभार व्यक्त केले.

Comments