सर्वसामान्यांच्या अस्वस्थ मनाची कुजबुज…

सर्वसामान्यांच्या अस्वस्थ मनाची कुजबुज…

सद्या देशात पुतळे, जयंती, यात्रा, मंदिर यांच्या कार्यक्रमांनी जोर धरला आहे. याला कारण ही तसेच आहे. कारण आागामी काळात बाजार समिती, विधान सभा, लोकसभा च्या निवडणुका होणार आहेत. एक विशिष्ट पक्ष या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करताना पहावयास मिळत आहे. व याचेच अनुकरण लहान लहान पक्ष, संघटना करताना दिसत आहेत. सर्वसामान्यांचे दररोजचे जीवन जगणे मुश्किल झाले असताना या बाबींचा होणारा अतिरेक व उदो-उदो संवेदनशील व्यकतीचे मन हेलावुन टाकणारे आहे.

पुतळे उभे करा, जयंती साजरी करा, विशिष्ट व्यकतीचे व्यक्तीमत्व समाजावर बिंबविण्यासाठी  यात्रा काढा पण हे करत असताना सर्वसामान्यांना ग्रहीत तरी धरु नका. शहरातील स्वच्छता, पाणी व्यवस्थापण, कचऱ्याचे ढिगारे, रोगराई, शिक्षण, रोजगार, महिलांचे हक्क, दिशाहीन होत चाललेले युवक याबाबत राजकारणी इतके कसे ढिम्म राहू शकतात.

सद्या लातूर मनपावर प्रशासन काम करत आहे. शहरात प्रत्येक वार्डात, कचऱ्याचे  ढिगारे साचत आहेत. रस्त्यांची चाळण झाली आहे. नियोजीत वृक्षारोपण न झाल्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. कचरा पेटवून हवा प्रदुषीत होताना दिसत आहे. या सगळ्यात कहर म्हणजे प्रशासनातील अधिकारी आपल्या कक्षाच्या बाहेर पडायला तयार नाहीत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तरदायी असे कोणत्याही अधिकाऱ्याचे काम होताना दिसत नाही. मग नागरीकांनी कोणाच्या तोंडाकडे पहायचे.

राजकारणी नामानिराळे

लातूर मनपात प्रशासकीय राज असल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना राजकारणी हवे तवढे महत्व देताना दिसत नाहीत. अन प्रशासन दरबारी  सामान्यांचे कामेही होत नाहीत. इकडे आड अन तिकडे विहीर अशा पेचात सर्वसामान्य जनता अडकली आहे. लातूरातील राजकारणी मात्र सर्वसामान्यांच्या या सर्व प्रश्नांपासुन नामानिराळे राहत आहेत.

Comments