गुळ फॅक्टरीही उभी करु न शकलेल्या आमदार कराड यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध - रविंद्र काळे
लातूर (प्रतिनिधी) : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी लातूर जिल्ह्यात आर्थिक क्रांती आणली आहे. हे कारखाने उत्कृष्ठ चालविल्यामुळे सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले आहे. विकासाची मंदीरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कारखान्यावर आणि कारखाने चालवणाऱ्या नेतृत्वावर टिका करण्याचा साधी गुळ फॅक्टरीही उभी करु न शकलेल्या अहंकारी आमदार रमेश कराड यांना अधिकार नाही. जिल्ह्यातील संपुर्ण शेतकरी, कष्टकरी समाजाच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगून आगामी काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा कडक इशारा विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे यांनी ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरु आहे. या निवडणूकीत उभे करण्यासाठी ज्यांना उमेदवार मिळाले नाहीत. पक्षातील लोकांकडून सहकार्य मिळत नाही असे आमदार रमेश कराड यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. लातूर, रेणापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी विकास पॅनलचा विजय दिसत असल्यामुळे आमदार रमेश कराड यांनी शनिवारी त्यांचा पॅनलचा मेळावा घेऊन त्यात असंबंध अशी वक्तव्य केली आहेत.
आमदार रमेश कराड यांनी आयोजीत केलेल्या मेळाव्याकडे मतदार आणि त्यांच्यापक्षातील नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. या परिस्थितीत त्यांनी विषय आणि ताळतंत्र सोडून तालुक्यात आणि जिल्ह्यात चांगल्या चालणाऱ्या संस्थावर टिका केली, चांगल्या संस्था चालवणाऱ्या नेतृत्वावर गरळ ओकण्याचा घाणेरडा प्रकार केला आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर निवडणूक 2023 लढवत असलेल्या कृषी विकास पॅनलने कृषी संस्कृतीचे प्रतिक म्हणून नंदीबैल हे निवडणूक चिन्ह निवडले आहे. या पॅनलला मतदारातून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आमदार कराड यांच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. त्यांनी बेताल, अनावश्यक वक्तव्ये बंद करावीत, लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी,असेही शेवटी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे यांनीप्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Comments
Post a Comment