लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजपा ताकदीने लढणार – आ.रमेशअप्पा कराड

          

लातूर दि. ७ - येत्या काळात केंव्हाही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर होऊ शकते. ही निवडणूक शेतकर्‍यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकतीनिशी लढवणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

            लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक अनुषंगाने लातूर तालुक्यातील प्रमुख भाजपा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा राष्ट्रीय किसान मोर्चाचे श्री. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात झाली. याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, तालुका अध्यक्ष बन्सी भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.


            यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत पराभव होणार याचा अंदाज आल्याने देशमुखांनी न्यायालय गाठले न्यायालयात दाखल प्रकरणाचा अद्याप निकाल लागला नाही. मात्र यावेळी कायदेशीर सल्ला घेऊन गाफील न राहता बाजार समितीची निवडणूक भाजपा ताकतीनिशी लढणार असून दहा-पंधरा वर्षापूर्वी भाजपाची ताकद कमी होती. आज देशात भाजपा सर्वात मोठा राजकीय पक्ष असून जिल्ह्यात या पक्षाची मोठी ताकद असल्याने येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच निवडणूका भाजपा ताकदीने लढणार असल्याचे सांगितले.  

Comments