४ मार्च रोजी ‘लाईनमन डे’ होणार साजरा
वीज कामगारांच्या कामाचा होतोय पहिल्यांदाच सन्मान
लातूर, दि.१:- केंद्र शासनाने ४ मार्च २०२३ रोजी देशभरात ‘लाईनमन दिवस’ साजरा करणेबाबत सर्व सार्वजनिक आणि खाजगी विदयुत क्षेत्रातील आस्थापनांना निर्देशित केले आहे. त्यानुसार ४ मार्च रोजी महावितरणच्या लातूर परिमंडलातही विविध स्तरावर ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीपासून पहिल्यांदाच ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्यात येत असल्याने विदयुत क्षेत्रात अत्यंत जोखमीचे व कष्टदायी काम करुन जनतेला प्रकाश पुरविणाऱ्या लाईनमन वर्गात उत्साहचे वातावरण आहे.
जनमित्र अर्थात लाईनमन हा विदयुत वितरण व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठयासाठी चोवीस तास सेवा देतात. देशभरातील लाईनमनबदल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने लाईनमन दिवसाच्या आयोजनाबाबत दिलेल्या निर्देशानुसार महावितरणतर्फे प्रादेशिक व परिमंडलस्तर, मंडल व विभागस्तर आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात उपविभाग किंवा अतिदुर्गम भागातील शाखा कार्यालयातही स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या त्या स्तरावर सहव्यवस्थापकीय संचालक किंवा प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी कार्यालय प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित असतील. अशा कार्यक्रमातून वीज सुरक्षेची शपथ, सुरक्षेबाबत प्रबोधन आणि महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
लातूर परिमंडलातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्हृयात विविध स्तरावर ४ मार्च रोजी होणाऱ्या लाईनमन दिवस कार्यक्रमास नियमित व बाहृयस्त्रोत अशा सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

Comments
Post a Comment