पूर्णवादीच्या संचालकपदी सुमुख गोविंदपूरकर यांची बिनविरोध निवड

 पूर्णवादीच्या संचालकपदी सुमुख गोविंदपूरकर यांची बिनविरोध निवड 

लातूर :  पूर्णवादी नागरिक सहकारी बँक, लि .बीडच्या संचालकपदी  लातूरचे उदयोन्मुख युवा नेतृत्व सुमुख अशोकराव  गोविंदपूरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

       पूर्णवादी नागरिक सहकारी  बँकेच्या एकूण १७ संचालकांची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. निरंतर व पारनेरकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या १७ उमेदवारांनी आपले अर्ज  दाखल केले होते. १७ जागांसाठी १७ उमेदवारांचे अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. यामध्ये लातूर जिल्ह्यातून सुमुख गोविंदपूकर यांची बिनविरोध झाली. सुमुख गोविंदपूरकर यांच्या रूपाने गोविंदपूरकर घराण्यातील तिसरी पिढी सहकार - सामाजिक कार्यात पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. पूर्णवादी नागरीक बँकेत एकूण ८०० कोटींच्या ठेवी असून बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. बँकेच्या एकूण २५ शाखा असून लवकरच नवीन शाखांचा विस्तार होणार आहे.

    सुमुख यांचे आजोबा दिवंगत स्वातंत्र्य सैनिक वसंतराव गोविंदपूरकर हे  ३५ व्या वर्षी नगरसेवक व बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आले होते. सुमुखचे  वडील अशोकराव गोविंदपूरकर हे ३२ व्या वर्षी नगरसेवक झाले होते.  लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.  तसेच ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मागच्या अनेक वर्षांपासून संचालक आहेत. उदयोन्मुख युवा नेतृत्व सुमुख यांचे वय केवळ २८ वर्षांचे असून आपल्या आजोबा व पित्यापेक्षा कमी वयात ते सहकार - सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाले आहेत.  बिनविरोध निवड झाल्याबद्दल सुमुख गोविंदपूरकर यांनी बँकेचे सभासद,खातेदार, हितचिंतकांचे आभार मानले असून पॅनलमध्ये संधी दिल्याबद्दल  त्यांनी डॉ. निरंतर व पारनेरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Comments