१९ मार्चपासून शेतकरी परिक्रमा : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार

 १९ मार्चपासून शेतकरी परिक्रमा शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार



   लातूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी दि.१९  मार्च पासून रेणापूर तालुक्यातील पानगाव येथून शेतकरी संघटनेचे नेते अनंतराव देशपांडे यांच्या नेतृत्वात शेतकरी परिक्रमा सुरू केली जाणार आहे.पत्रकार भवन येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

      राज्यासह देशातील अनेक भागात आजपर्यंत साडेचार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.सातत्याने त्यात वाढ होत आहे.त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत.देश या वर्षी स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करतो आहे. नव्वदच्या दशकात खुलीकरण आले पण शेती क्षेत्राला त्याचा स्पर्शही झाला नाही.राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचा प्रश्न तिजोरीतील पैश्याच्या वाटपातून सोडवायचा आहे.हा मार्ग वापरून त्यात अपयश आले आहे.त्यामुळेच शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे.तरीही राज्यकर्ते तो मार्ग सोडून शेतकऱ्यांना स्वतंत्र करायला तयार नाहीत. शेतकऱ्यासाठी काम करणारे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांच्या मनात काय चालू आहे ? ते जाणून घेण्यासाठी ही परिक्रमा करण्याचे ठरवण्यात आले आहे.

    चिलगव्हाण या गावातील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी दि.१९ मार्च या दिवशी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह  आत्महत्या केली होती.१९८०  सालातील शेतकरी आंदोलनात पानगावचे शेतकरी रमेश मुगे हुतात्मा झाले होते.म्हणून त्यांच्या स्मृतीस्थळापासून परिक्रमा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.१८ जून १९५१रोजी,ज्या दिवशी पहिली घटना दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पारतंत्र्यात टाकणारे परिशिष्ट ९ जोडण्यात आले आहे.म्हणून १८ जून रोजी परिक्रमेची सांगता होणार आहे.

    या बैठकीस संघटनेचे नेते अनंतराव देशपांडे,कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे,प्रा.शेषेराव मोहिते,मराठवाडा प्रमुख रामजिवन बोंदर,रमेश चिल्ले, माजी जिल्हाध्यक्ष माधवराव कंदे, शिवाजी पाटील नदीवाडीकर,पूर्व भाग जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, पश्चिम भाग जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील,युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके,संपर्क प्रमुख मदन सोमवंशी,कार्याध्यक्ष बालाजी जाधव,जगन्नाथ मिरकले,हरिश्चंद्र सलगरे,वसंत कंदगुळे,बालादाजी सोमवंशी,शिवाजी काळे,वसंत कंदगुळे,किशनराव शिंदे,करण भोसले,शंकर निला, दत्ता गुंजूटे, शिवराज पाटील, पंडीत देशमुख, सोपान सुरवसे, नंदकुमार आळंदकर आदींसह पदाधिकारी व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments