जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे 25 फेब्रुवारीपासून आयोजन

 जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे 25 फेब्रुवारीपासून आयोजन

·  ‘आत्मा’ कार्यालयामार्फत आयोजन ·      जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

लातूर, दि.20 (जिमाका) : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीमध्ये सिध्देश्वर आणि रत्नेश्वर मंदिर परिसरात लातूर जिल्ह्याचा श्री सिध्देश्वर कृषि महोत्सव-2023 आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषि महोत्सवाला भेट देवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

कृषि यांत्रिकीकरण, खते, किटकनाशके, सिंचनाची साधने, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, कृषि क्षेत्रातील नाविण्यपूर्ण बाबी इत्यादीबाबत जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती मिळावी, या उद्देशाने जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया, पशुपालन, दुग्धोत्पादन, कृषि यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती अशा विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद तसेच शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे. तसेच  175 स्टॉलमधून कृषि गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि उत्पादक ते ग्राहक दालनाच्या माध्यमातून माफक दरात थेट खरेदी व विक्री करण्यात येणार आहे.

कृषि विभागामार्फत कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विद्यापीठाचे स्टॉल, विविध कृषि निगडीत साहित्याचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच या महोत्सवास विविध मान्यवर भेटी देणार आहेत. जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे 25 फेब्रुवारी 2023 रोजी उद्घाटनाचा होणार असून 1 मार्च 2023 रोजी समारोप व बक्षीस वितरण होईल. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला गटांनी या कृषि महोत्सवात सहभागी व्हावे. कृषि महोत्सवाला भेट देवून लातूर जिल्ह्याच्या कृषि विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय कृषि सहसंचालक आणि आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Comments