अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील

शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार ठिबक, तुषार सिंचन संच

·      महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन


लातूर, दि. 22 (जिमाका) : अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा, यासाठी त्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजना सन 2022-23 अंतर्गत अनुदानावर ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.


अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांना राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक  योजना सन 2022-23 अंतर्गत 55 टक्के, तर बिरसा मुंडा कृषि क्रांती स्वावलंबी योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेतून 35 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या बहुभूधारक शेतकरी बांधवांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून 45 टक्के, तर बिरसा मुंडा कृषि क्रांती स्वावलंबी योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेतून 35 टक्के असे एकूण 80 टक्के अनुदान दिले जाईल.


ठिबक व तुषार सिंचनामुळे उत्पादनात व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होते. तसेच पाण्याचा काटेकोर वापर झाल्याने तणांची वाढ रोखण्यास मदत होते. सिंचन क्षेत्रात वाढ होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.

Comments