शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सहलीचे आयोजन

बारामती, राहुरी, सिल्लोड कृषि महोत्सवाला देणार भेट

28 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


लातूर, दि. 22 (जिकामा) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत लातूर कृषि उपविभागातील 60 शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत 2 जानेवारी ते 6 जानेवारी 2023 दरम्यान बारामती, राहुरी कृषि विद्यापीठ, सिल्लोड येथील कृषि प्रदर्शन, दिंडोरी, आळंदी याठिकाणी असलेल्या संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट, कृषि प्रदर्शन आदी स्थळांना भेटी देण्याचे नियोजन आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी 28 डिसेंबर 2022 पर्यंत आपले लेखी अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन लातूरचे उपविभागीय कृषि अधिकारी महेश क्षीरसागर यांनी केले आहे.


लातूर तालुक्यातील 14,औसा तालुक्यातील 18, निलंगा तालुक्यातील 13, रेणापूर तालुक्यातील 10 आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 5 अशा एकूण 60 शेतकऱ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. फलोत्पादन विषयक घटक राबविलेले तसेच राबविण्यास इच्छूक असलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात लेखी अर्ज सादर करून त्याची पोहच घ्यावी. अर्जासोबत सातबारा, दहावीची सनद, आधार कार्ड, कोविडच्या देान्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्सस प्रत जोडणे आवश्यक राहील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य राहील. त्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. तालुकानिहाय लक्षांकाप्रमाणे कमी अर्ज आल्यास तालुक्याअंतर्गत लक्षांक कमी अथवा जास्त करण्यात येईल.


लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांची निवड सोडत (लॉटरी) पध्दतीने करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी लोकसहभाग म्हणून प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनाकर्ष (डी.डी) निवड यादी लागल्यापासून दोन दिवसात सबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावा.


प्रशिक्षण कालावधीमध्ये भोजन, नाष्टा व निवासाची व्यवस्था करण्यात येईल. या प्रशिक्षण सहलीच्या आयोजनामध्ये कोणताही बदल करण्याचे अधिकार लातूर उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडे अबाधित राहतील. प्रशिक्षण सहलीसाठी उपविभागस्तरावर समन्वयक अधिकारी म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि अधिकारी व्ही. एस. डोंगरे (भ्रमणध्वनी क्र. 9323538502) यांची नियुक्ती करण्यात आली असून सहलीबाबत अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे उपविभागीय अधिकारी महेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Comments