केशवराज देवस्थानमध्ये सोमवारी अन्नकुट प्रसादाचे आयोजन

 


लातूर :  प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही येथील श्री केशवराज देवस्थानच्या वतीने सोमवार, दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अन्नकुट प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

अन्नकुट प्रसादाच्या अनुषंगाने रविवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता हरीहर भेट निमित्त मंदिरात सामूहिक सुंदरकांडचे पठण  व मध्यरात्री विष्णुसहस्त्रनामासोबत सहस्त्र बिल्वपत्राचे अर्पण श्री केशवराजांना करण्यात येणार आहे. श्री केशवराज हे विष्णूचे अवतार असल्याने केशवराजाला वर्षभर केवळ तुळशीचा हार असतो. परंतु त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी हरी - हर  भेट सांगितली जाते. त्यामुळे त्यादिवशी केशवराजास (हरी) यांना बिल्वपत्र तर महादेवाच्या (हर) पिंडीवर तुळशीपत्र  वाहिले जाते. हा अनोखा प्रसंग पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित असतात.

अन्नकुट  प्रसादाचे वितरण भाविकांना सोमवारी सायंकाळी चार वाजता करण्यात येणार आहे. या अन्नकुट  प्रसादाचा लाभ लातूर शहर व परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री केशवराज देवस्थानचे सचिव अशोक गोविंदपूरकर यासह  सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

Comments