लातूर : लातूर जिल्हा सकल जंगम समाजाच्या वतीने येत्या दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या वधू - वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी चालू असल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिवसैनिक त्र्यंबक गुरुनाथ स्वामी यांनी दिली.
सदर मेळावा रविवार,दि. ६ नोव्हें. रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत औसा रोडवरील भागीरथी मंगल कार्यालय, बिडवे लॉन्स याठिकाणी संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीविषयी अधिक माहिती देताना अध्यक्ष त्र्यंबक स्वामी पुढे म्हणाले की, हा मेळावा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज सोलापूर व डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, हिरेमठ संस्थान, औसा यांच्या दिव्य सान्निध्यात व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वधू - वर परिचय मेळाव्याचे आयोजनही सध्या काळाची गरज बनली आहे. एकाच छताखाली अनेक स्थळे पाहण्याची सोय समाज बांधवांना व्हावी, विवाह जुळविण्यासाठी होणाऱ्या खर्चात कमी व्हावी, समाजातील विविध स्तरातील मान्यवर एकत्रित येऊन वैचारिक देवाण - घेवाण शक्य व्हावी अशा अनेक उद्देशांनी प्रेरित होऊन वधू - वर परिचय मेळावे आयोजिण्यात येत असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
हा मेळावा निःशुल्क असून नाव नोंदणीसाठी तसेच अन्य कोणत्याही कारणासाठी पालकांना कोणत्याही प्रकारचा शुल्क भरावा लागणार नाही. मेळाव्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या पालकांची , उप वधू - वरांची दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री मुक्कामाची सोय कार्यक्रमस्थळी करण्यात आली आहे. केवळ एवढेच नाही तर मेळाव्याच्या दिवशी काही वधू - वर , पालक यांना एखादे स्थळ पसंत पडले तर त्यांना एकत्रित येऊन विचार विनिमय करण्यासाठी भागीरथी मंगल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त रूम्स , हॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकल लातूर जिल्हा सकल जंगम कार्यकारीणी एक समाज भावनेतून उपक्रम राबवत आहे. मात्र योग्य जोडीदार निवडण्याची सर्वस्वी जबाबदारी वधू वर व पालकावरच असणार आहे. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उप वधू - वरांनी आपली नावे सुनील शिवलिंग स्वामी यांच्या ७५८८५ ५५५५९ या व्हाटसअप नंबरवर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी लातूर जिल्हा जंगम समाज प्रणित सकल जंगम समाज वधू - वर परिचय मेळावा २०२२ चे उपाध्यक्ष मन्मथ स्वामी बाभळगावकर, सचिव हावगी मानवेंद्र स्वामी, कोषाध्यक्ष नागनाथ वीरुपाक्षप्पा चिट्टे , कार्याध्यक्ष दयानंद स्वामी ( कोकलगे ) घरणीकर, सहसचिव दयानंद स्वामी उजेडकर, स्वागताध्यक्ष शिवप्रसाद काशिनाथ स्वामी, महिला कार्याध्यक्षा सौ. सविता विजयकुमार स्वामी, महिला संघटिका सौ. स्वाती जगदीश स्वामी यासह सर्व पदाधिकारी - समाजबांधव परिश्रम घेत असल्याचे त्र्यंबक स्वामी यांनी सांगितले.

Comments
Post a Comment