औरंगाबाद (प्रतिनिधी) दि ३० ऑक्टो 'शिवशक्ती भवन' सभागृहात इंधन संवर्धनावर संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महाऊर्जा प्रकल्प अधिकारी श्री आशिष लिबडे व माऊंट अबू राजस्थान येथील अभियंता ब्रह्माकुमार सेल्वम यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी पीपीटी द्वारे 'शाश्वत विकासासाठी ऊर्जा स्रोत ' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात उप सेवा केंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी शांता दीदी, पूर्व पोलीस निरीक्षक रघुनाथ पुके आणि उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते महाऊर्जा चे जनजागृती भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. वीज बचत आणि उर्जा कार्यक्षमता यांचा संदेश लोकांमध्ये पोचवणे व स्वच्छ हरित भारताच्या उभारणीस सहाय्य तसेच इंधन/क्रूड इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे यासाठीची ही प्रमुख जनजागृती मोहिम असल्याचे महाऊर्जा प्रकल्प अधिकारी आशिष लिबडे यांनी सांगितले. महाऊर्जा - महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना यांच्या विषयी माहिती कार्यक्रमात सादर करण्यात आले.
माऊंट अबू राजस्थान येथील आलेले अभियंता ब्रह्माकुमार सेल्वम यांनी इंधन संवर्धनाच्या महत्वावर भर दिला आणि ब्रह्माकुमारीस यांच्या इंडो जर्मन प्रकल्प सारख्या पूर्ण लक्ष्यकेंद्री कार्यक्रमाची गरज अधोरेखित केली. आपल्या दररोजच्या जीवनात इंधन संवर्धन मंत्र अंगीकारण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. 'हरित आणि स्वच्छ उर्जेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव / हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा’ हे घोषवाक्य असलेली ही मोहीम देशात वर्षभर सुरु राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन श्री. रघुनाथ पुके यांनी केले. समारोप इंधन संरक्षण प्रतिज्ञेने करण्यात आला. कार्यक्रमात औद्योगिक, डोमेस्टिक, कृषी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी ऊर्जा संरक्षण अभियानात सहभाग नोंदवला.

Comments
Post a Comment